शिक्रापूर: रिपेरिंगसाठी दुकानात ठेवण्यात आलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी रामदास आनंदराव सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(४) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला आणि दुरुस्तीसाठी आलेले १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरून नेले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजय हनुमंत जाधव याने आपले साथीदार संतोष बालाजी लोहार आणि वैभव अशोक घुमरे यांच्या साथीने या चोरीचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत आरोपींचा माग काढला. आरोपी सणसवाडी परिसरातील एल अँड टी फाट्याजवळ असल्याची खात्रीलायक माहिती डायल ११२ च्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तातडीने कारवाई करत अजय हनुमंत जाधव (वय २५), संतोष बालाजी लोहार (वय २४) आणि वैभव अशोक घुमरे (वय २१) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना २९ जून रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या आरोपींकडून एक लाख रुपये किमतीचे चोरीला गेलेले १० इलेक्ट्रिक मोटार पंप जप्त करण्यात आले आहेत.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस हवालदार मळेकर, नितीन सुद्रीक तसेच पोलीस शिपाई नागेश वाघमारे, विकास बांगर, संतोष बाबर, ललित चक्रनारायण आणि कृष्णा बडे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. डी. मळेकर हे करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा