अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
माळेगाव पोलीस ठाण्याचा कारभार ‘रणरागिणीं’च्या हाती; जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम

0
5
8
4
3
2
माळेगाव: स्त्रीशक्तीचा सन्मान आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आज, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माळेगाव पोलीस ठाण्यात एक आदर्शवत उपक्रम राबवण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलीस ठाण्याचा संपूर्ण प्रशासकीय आणि तांत्रिक कार्यभार महिला पोलीस अंमलदारांनी यशस्वीपणे सांभाळला.
ठाण्यापासून ते सारथ्यापर्यंत…
सर्वत्र महिलांचे वर्चस्व!
आज पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांचे स्वागत करण्यापासून ते गुन्ह्यांची नोंद करण्यापर्यंतची सर्व महत्त्वाची पदे महिलांनी भूषवली. यामध्ये खालीलप्रमाणे जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले होते:
* ठाणे अंमलदार: महिला पोलीस हवालदार शेख यांनी मुख्य सूत्रे हाती घेतली.
* CCTNS विभाग: ऑनलाइन गुन्हे नोंदणी व संगणकीय प्रणालीचे कामकाज महिला अंमलदार गायकवाड व जाधव यांनी चोख बजावले.
* वायरलेस व संदेशवहन: तातडीच्या निरोपांची देवाणघेवाण महिला अंमलदार शिंदे यांनी सांभाळली.
* डायल ११२ (प्रतिसाद पथक): आपत्कालीन मदतीसाठी सज्ज असणाऱ्या ‘डायल ११२’ ची धुरा महिला अंमलदार केंद्रे आणि सूळ यांनी सांभाळली.
* प्रशासकीय विभाग: पासपोर्ट पडताळणीचे काम महिला अंमलदार बनसोडे, तर कार्यालयीन मदतनीस म्हणून महिला अंमलदार बनगर यांनी जबाबदारी पार पाडली.
* वाहन चालक: विशेष म्हणजे, पोलीस वाहनाचे सारथ्य करत महिला पोलीस अंमलदार प्रेरणा सावंत यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली.
कामकाज सुरू असतानाच, माळेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सचिन लोखंडे यांनी सर्व महिला अधिकारी व अंमलदारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. “महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे माळेगाव पोलीस दलातील या रणरागिणींनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांचे कौतुक केले.





