Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

चारित्र्याच्या संशयातून संसाराची राखरांगोळी! नराधम पतीने पेटत्या लाकडाने पत्नीला ठेचले; वालचंदनगर पोलिसांनी जेजुरीत सिनेस्टाईल पाठलाग करून ठोकल्या बेड्या

0 6 7 5 8 4

वालचंदनगर: चारित्र्याच्या संशयाने एका हसत्याखेळत्या संसाराचा काही क्षणात अंत केला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नराधम पतीने चक्क चुलीतील पेटत्या लाकडाने पत्नीला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे घडली. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाईल घरीच ठेवून पळालेल्या या आरोपीचा वालचंदनगर पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि सिनेस्टाईल पाठलाग करून जेजुरी येथे मुसक्या आवळल्या आहेत. अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद केल्याने वालचंदनगर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंगळवारी (दि. २३) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेळगाव (ता. इंदापूर) येथे ही थरारक घटना घडली. मयत मनिषा मल्हारी खोमणे (वय ३५) या सकाळी अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवत होत्या. त्याचवेळी त्यांचे पती मल्हारी रोहिदास खोमणे (वय ३५) याने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालण्यास सुरुवात केली. शब्दाने शब्द वाढला आणि रागाचा पारा चढलेल्या मल्हारीने चुलीमध्ये जळत असलेले एक मोठे लाकडी दांडके बाहेर काढले. त्या पेटत्या लाकडानेच त्याने मनिषा यांच्या डाव्या हातावर, पायावर आणि डोक्यावर सपासप वार केले. या क्रूर हल्ल्यात मनिषा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.

पत्नीची हत्या केल्यानंतर आपण पकडले जाऊ नये, यासाठी आरोपी मल्हारी याने अत्यंत चलाखीने स्वतःचा मोबाईल फोन घरातच ठेवला, जेणेकरून पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करता येऊ नये. त्यानंतर स्वतःच्या चारचाकी गाडीतून तो घटनास्थळावरून पसार झाला. इकडे गंभीर जखमी झालेल्या मनिषा यांना नातेवाईकांनी तात्काळ इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासाअंती त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मयत महिलेची आई बबई भिमराव मदने (रा. शेळगाव) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) १०३ (१) आणि ३५२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली. आरोपी मोबाईल न वापरता पळाल्यामुळे त्याला शोधणे एक आव्हान होते. मात्र, पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत खबर मिळाली की, आरोपी हा जेजुरी परिसरात आहे.

पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर जेजुरीत पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने आपल्या चारचाकी वाहनाचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, वालचंदनगर पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी फिल्मी स्टाईलने आरोपीच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्याला शिताफीने घेरून जेरबंद केले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांत (सायंकाळी ७:४५ वा.) आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.

 

आरोपी मल्हारी रोहिदास खोमणे याला अटक करून इंदापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २९ डिसेंबर २०२५ पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि राजकुमार डुणगे करत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार डुणगे, पोसई विजय टेळकीकर, मिलींद मिठापल्ली, रतिलाल चौधर तसेच अंमलदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्रय चांदणे, जगदीश चौधर, दादासाहेब डोईफोडे, विकास निर्मळ, महेश पवार, अजित थोरात, गणेश काटकर, किर्तीलाल गायकवाड, रविंद्र पाटमास, विक्रमसिंह जाधव, राहुल माने, गणेश वानकर आणि ज्योती डिसले यांनी पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे