अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
‘श्रीनाथ साहेब टायगर्स’ची डरकाळी! सलग दुसऱ्यांदा ‘सोमेश्वर प्रीमियर लीग’वर नाव कोरले; मोरगावचे ‘डी. जी. लायन्स’ उपविजेते

0
5
4
4
2
6
सोमेश्वर बारामती : बारामती ग्रामीण परिसरातील क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘सोमेश्वर प्रीमियर लीग (SPL) २०२५’ च्या चषकावर सलग दुसऱ्या वर्षी वडगाव निंबाळकरच्या ‘श्रीनाथ साहेब टायगर्स’ संघाने आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत टायगर्सनी विजेतेपद पटकावले, तर मोरगावच्या ‘डी. जी. लायन्स’ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बुवासाहेब हुंबरे मित्र परिवारातर्फे आयोजित ही टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धा दिनांक २३ ते २७ डिसेंबर २०२५ या कालावधीत एस. एम. गलांडे मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली.

अंतिम सामन्याचा थरार आणि बक्षीस वितरण
अंतिम लढतीत श्रीनाथ साहेब टायगर्सने बाजी मारली. विजेत्या संघाला सोमेश्वर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे यांच्या हस्ते तब्बल १,११,१११ रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्या डी. जी. लायन्स संघाला रोहिणी कदम-ढोले यांच्या हस्ते ५५,५५५ रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

स्पर्धेत ‘वाघळवाडी टायगर्स’ संघाने तृतीय (पुरस्कर्ते: चांगदेव दुर्वे), तर ‘झीशान स्मॅशर्स करंजे’ संघाने चतुर्थ (पुरस्कर्ते: शेखर भगत) क्रमांक पटकावला. तसेच वैयक्तिक कामगिरी गाजवणाऱ्या खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणून टीव्ही, सायकल, बॅट आणि शूज अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

१२ संघ आणि लिलाव पद्धतीचे आकर्षण
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे आयपीएलच्या धर्तीवर खेळाडूंचा झालेला लिलाव. बारामती ग्रामीण भागातील जवळपास पावणेदोनशे खेळाडूंना १२ संघांमध्ये लिलाव पद्धतीने विभागण्यात आले होते. पश्चिम भागातील नामवंत संघ मालकांनी यात सहभाग घेतल्याने अनेक अटीतटीचे व चुरशीचे सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले.
बक्षीस वितरण समारंभास प्रमोद काका काकडे, राजवर्धन दादा शिंदे, रमाकांत गायकवाड, ऋषी गायकवाड, विलास शेंडकर, ताराचंद शेंडकर, शिवाजीराव शेंडकर, माणिकराव काळे, सुनील ढोले, सुचिता साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.
या सामन्यासाठी मैदानावरील विशेष उपस्थितीत वडगाव निंबाळकर येथील ग्रामपंचायत सदस्य पिंटू किर्वे, संतोष दरेकर, पोलीस निरीक्षक एस आर पी एफ दौंड चे सुनील ठोंबरे. वडगाव निंबाळकरचे माजी सरपंच रवींद्र जाधव, भैरवनाथ मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र पवार,युवा उद्योजक किशोर साळुंखे, वीरेंद्र जाधव,अनिल गायकवाड हे उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किरण शेंडकर, सरपंच भाऊसाहेब हुंबरे, जितू सकुंडे, नितीन साखरे, पापा मुलानी, शशिकांत जेधे, दत्तात्रय सोनवणे, दिव्यतेज शेंडकर आणि ओम शेंडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच एस. एम. गलांडे यांनी मैदान उपलब्ध करून दिले. पंच, समालोचक आणि युट्युब टीमच्या अचूक नियोजनामुळे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर पोहोचली.
स्पर्धेची वैशिष्ट्ये:
* विजेता: श्रीनाथ साहेब टायगर्स (सलग दुसरे वर्ष)
* प्रथम बक्षीस: ₹१,११,१११/-
* सहभाग: १२ संघ (लिलाव पद्धतीने निवड)
* प्रतिसाद: ग्रामीण भागातील प्रेक्षकांची विक्रमी गर्दी
ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा पुढील वर्षी अधिक भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.







