गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
“बहिणीची छेड का काढली?” जाब विचारणाऱ्या भावावर सराईताचा ‘कोयता’ हल्ला! वर्षभर पोलिसांना गुंगारा देणारा ‘गौरव टेंगले’ अखेर जेरबंद; बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

0
6
1
9
8
2
बारामती: विद्या प्रतिष्ठानचा परिसर…
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात एका सराईत गुन्हेगाराने माजलेली दहशत, भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड आणि जाब विचारणाऱ्या भावावर झालेला जीवघेणा हल्ला… या थरारक घटनेने बारामती हादरली होती. तब्बल एक वर्ष पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून फिरणाऱ्या या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात अखेर बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे.

१५ जानेवारीचा तो दिवस. विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या परिसरात एका तरुणाने आपल्या अल्पवयीन बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाला जाब विचारला. “माझ्या बहिणीला का त्रास देतोस?” एवढाच त्याचा प्रश्न होता. पण गुन्हेगारी वृत्तीच्या गौरव दिलीप टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी, पणदरे) याची ही हिंमत खपवून घेतली नाही.
संतापाच्या भरात गौरवने त्या तरुणावर थेट हातातील लोखंडी कड्याने आणि कमरेला लावलेल्या कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहून परिसरात खळबळ उडाली, तर आरोपीने तिथून पळ काढला. या घटनेनंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात बी.एन.एस आणि ‘पोक्सो’ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाले.
गुन्हा घडल्यापासून गौरव टेंगले फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते, पण तो सतत ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. गौरव हा काही साधासुधा आरोपी नव्हता. त्याच्यावर यापूर्वीही भिगवण, बारामती शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीमला गुप्त माहिती मिळाली की, वर्षभर फरार असलेला गौरव टेंगले बारामती एमआयडीसी परिसरात आला आहे. क्षणाचाही विलंब न करता १९ डिसेंबर रोजी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला असावा, पण ‘खाकी’च्या विळख्यात तो अलगद अडकला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी कोठडीत केली.
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पीएसआय युवराज पाटील, महिला पीएसआय धनश्री भगत, कल्याण शिंगाडे, आणि पोलीस अंमलदार मनोज पवार, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, दादा दराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत करत असून, न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे परिसरातील टवाळखोरांचे आणि गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.






