
बारामती : बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिगवण रोडवरील एका नामांकित लॉजवर सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापार (Sex Racket) उद्योगाचा पोलिसांनी थरारक छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून, पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकललेल्या आसाम आणि पश्चिम बंगालमधील चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बारामती-भिगवण रोडवरील ‘प्रणव लॉज’ येथे परराज्यातील महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. या माहितीची खातरजमा करून महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी दि. ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:४५ च्या सुमारास पथकासह या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे,
१. सोमनाथ महादेव खोमणे (रा. सावळ, ता. बारामती)
२. धिरज रामभाऊ जाधव (वय २६, रा. जालना)
३. सागर संजय सकट (वय ३०, रा. काटेवाडी, ता. बारामती)
४. मेराजुल जानीफ अली (वय २४, रा. गोलपारा, आसाम)
५. अफजल मझीबर रहमान हुसेन (वय ३६, रा. बरपेटा, आसाम)
६. सद्दाम जुमरुद्दीन हुसेन (वय २४, रा. बरपेटा, आसाम)
या आरोपींनी आपापसात संगनमत करून पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून वेश्यागमन व्यवसाय करून घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजिविका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत पोलिसांनी आसाम आणि पश्चिम बंगालमधील अनुक्रमे ३०, २१, २६ आणि २२ वर्षे वयोगटातील चार तरुणींची सुटका केली आहे. या महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(३), ३(५) आणि स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ (PITA) च्या कलम ४ आणि ५ नुसार गुन्हा (गु.र.नं. १०४/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपासही ते स्वतः करत आहेत. या मोठ्या कारवाईमुळे बारामती परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा