बारामती: लीनेस क्लब, बारामती यांच्या वतीने आयोजित ‘माँ से बेटी सवाई’ या विशेष उपक्रमांतर्गत निंबूत येथील सौ. नंदा काकडे यांना ‘आदर्श माता’ पुरस्काराने गौरविण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या मातांचा सन्मान करण्यासाठी रविवारी (दि. १२ एप्रिल) बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघात या प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘मुलगी घरात जन्माला येणे ही भाग्याची गोष्ट आहे’ हा व्यापक संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे, कायदेविषयक जनजागृती, महिला सक्षमीकरण आणि कौटुंबिक समुपदेशन यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर ॲड. सुप्रिया विशाल बर्गे या गेली १८ वर्षे सातत्याने आणि प्रभावीपणे काम करत आहेत. त्यांच्या या भरीव सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. ॲड. सुप्रिया यांना घडवण्यात, त्यांच्यावर सुसंस्कार करण्यात आणि त्यांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्या आई सौ. नंदा काकडे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा गौरव म्हणून त्यांना हा ‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अत्यंत खडतर परिस्थितीतही मुलीला उच्च शिक्षण देऊन वकिलीसारख्या सन्माननीय क्षेत्रात नावलौकिक मिळवून देण्यामागे सौ. नंदा काकडे यांचे मोठे योगदान आहे.
या सोहळ्यात सौ. राधिका जाचक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सौ. नंदा काकडे व ॲड. सुप्रिया बर्गे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ॲड. सुप्रिया बर्गे यांनी अत्यंत मार्मिक विचार मांडले. “मुलींना केवळ जन्म देऊन थांबून चालणार नाही, तर त्यांना योग्य शिक्षण देऊन स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक आईने पुढाकार घ्यावा,” असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी उपस्थित मातांना दिला.
या समाजोपयोगी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शीतल यादव, रीनल शाह आणि मोनिका गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली मुनोत यांनी केले, तर सूत्रसंचालन मोनिका गांधी यांनी उत्तमरीत्या पार पाडले. आभारप्रदर्शन शुभांगी चौधर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीमा चव्हाण, विजया कदम, धनश्री भाभी आणि उज्वला शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सोहळ्याला परिसरातील महिला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा