अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत ‘बुलेट राजां’ना दणका! १११ सायलेन्सर जप्त; सव्वा महिन्यात २१ लाखांचा दंड वसूल बारामती वाहतूक शाखेची कारवाई.

0
7
2
0
2
7
बारामती: बारामती शहरात फॅशनच्या नावाखाली बुलेटला फटाक्यांसारखा आवाज करणारे सायलेन्सर लावून दहशत निर्माण करणाऱ्या बेशिस्त चालकांवर बारामती शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई केली आहे. गेल्या सव्वा महिन्यात पोलिसांनी तब्बल २१४१ जणांवर कारवाई करत २१ लाख ५८ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात प्रामुख्याने १११ बुलेटचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.

शहरात अनेक तरुण आपल्या बुलेट मोटर सायकलला कंपनीचे सायलेन्सर काढून त्याजागी फटाक्यांसारखा आवाज करणारे सायलेन्सर बसवून फिरत असल्याचे चित्र होते. या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत बारामती वाहतूक शाखेकडे नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेने शहरात विशेष मोहीम राबवली.
५ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान विशेष मोहीम
दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीत बारामती वाहतूक शाखेने धडक मोहीम राबवून बेशिस्त चालकांचे धाबे दणाणून सोडले. या काळात मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २१४१ वाहनांवर केसेस करण्यात आल्या.
कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे:
* सायलेन्सर कारवाई: फटाक्यांचा आवाज करणारे बुलेटचे एकूण १११ सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले.
* काळ्या काचा: ५१ वाहनांच्या काळ्या काचा (Black Film) काढण्यात आल्या.
* ड्रंक अँड ड्राईव्ह: मद्यप्राशन करून वाहन चालवणारे ५ चालक.
* अवैध प्रवासी वाहतूक: ६ वाहनांवर कारवाई.
याव्यतिरिक्त विना नंबर प्लेट, ट्रिपल सीट, विना लायसन्स, फॅन्सी नंबर प्लेट, विना इन्शुरन्स, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, नो-पार्किंग आणि नो-एंट्री अशा विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश माने, श्रेणी पीएसआय सुभाष काळे, तसेच पोलीस हवालदार प्रदीप काळे, अंमलदार दत्तात्रय भोसले, अजिंक्य कदम, आकाश कांबळे, महिला अंमलदार सीमा घुले, सुनीता ढेंबरे, आशा शिरतोडे, माया निगडे, स्वाती काजळे, रुपाली जमदाडे, रेश्मा काळे आणि अंमलदार अमोल मदने, योगेश कुंभार, प्रवीण सांगळे, श्रीधर कांबळे, सुनील भंडारे यांच्यासह होमगार्ड जवान अजित बिबे, थोरात, भंडलकर, पोंदकुले, खोमणे, नवले यांनी सहभाग घेतला.
नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि आपल्या वाहनांमध्ये अवैध बदल करू नयेत, असे आवाहन बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी व वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.







