अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
फलटणमध्ये ‘राजे’शाही खालसा; ३० वर्षांच्या सत्तेला सुरुंग, रणजितसिंहांचा ‘दांडगा’ विजय!

0
5
9
3
8
7
फलटण (विशेष प्रतिनिधी): १९९१ साल… ते २०२५ साल. सलग तीन दशके फलटणच्या राजकारणावर ज्यांची हुकूमत चालली, त्या विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सत्तेला आज अनपेक्षित सुरुंग लागला. ‘फलटण म्हणजे रामराजे’ हे समीकरण मोडीत काढत, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ‘न भूतो न भविष्यती’ असा विजय खेचून आणला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत खुद्द रामराजेंचे सुपुत्र श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना पराभवाचे पाणी पाजत, भाजपने समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने नगराध्यक्षपदावर कब्जा केला आहे.
बालेकिल्ल्यात ‘सर्जिकल स्ट्राईक’
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली व्यूहरचना आणि भाजप-राष्ट्रवादी युतीची ताकद यामुळे रामराजेंचा बालेकिल्ला पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. २७ पैकी १८ जागांवर (२ अपक्षांसह) युतीने स्पष्ट बहुमत मिळवत फलटण नगरपालिकेत कमळ फुलवले आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेनेचे वर्चस्व मानले जात होते, तिथेच मतदारांनी प्रस्थापितांना नाकारले आहे.
६०० मतांचा निर्णायक ‘गेमचेंजर’
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नगराध्यक्षपदाच्या लढतीत अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळाला. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजपच्या समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आघाडी घेतली होती. अखेर १६,४८९ मते घेत त्यांनी अनिकेतराजेंचा (१५,८८९ मते) ६०० मतांनी पराभव केला. हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नसून, तो रामराजेंच्या ३० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
’त्या’ २ मतांनी श्वास रोखला! (किरण राऊतांचा थरारक विजय)
निवडणुकीत किती चुरस होती, हे प्रभाग क्रमांक ६ ‘अ’ च्या निकालाने दाखवून दिले. भाजपचे उमेदवार किरण राऊत आणि शिवसेनेचे दीपक कुंभार यांच्यात अक्षरशः ‘काटे की टक्कर’ झाली. अखेर केवळ २ मतांनी किरण राऊत विजयी झाले आणि भाजपच्या गोटात जल्लोष झाला.
फलटणच्या सत्तेचे नवीन गणित
सत्ताधारी: भाजप-राष्ट्रवादी महायुती – १८ जागा (बहुमत)
विरोधक: शिवसेना (उबाठा) व मित्रपक्ष – ९ जागा
हा निकाल आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘लिटमस टेस्ट’ ठरणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या भावाला नगराध्यक्ष करत आणि स्वतःचे १८ नगरसेवक निवडून आणत, आपणच फलटणचे नवे ‘किंगमेकर’ असल्याचे सिद्ध केले आहे.






