ब्रेकिंगमहाराष्ट्र
गुन्हेगार आता सुटणार नाहीत, बारामती पोलीसांकडे आता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’, तपासाला मिळणार गती

0
6
8
4
8
2
बारामती : नुकतीच बारामती पोलीसांकडे फॉरेन्सिक व्हॅन तपासासाठी सज्ज झाली आहे,पोलीसांना दखलपात्र गुन्ह्यात वैज्ञानिक दृष्ट्या तपास करणे गरजेचे आहे. शिक्षेस पात्र असलेल्या गुन्हयात न्याय वैज्ञानिक तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करणे बंधनकारक आहे. गुन्हयांच्या घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याच्या तपासासाठी लागणारे पुरावे घटनास्थळीच गोळा करणे गरजेचे आहे व असते तसेच मिळालेल्या पुराव्यांचे विश्लेषण करणे आणि न्यायालयात सादर करणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.या सर्व घटनांमध्ये फॉरेन्सिक तपास गरजेचा असतो या अगोदर विविध गुणांच्या तपासाच्या अनुषंगाने काही गोष्टी तपासासाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळेत पाठवाव्या लागत असे व तेथून अहवाल मिळण्यास विलंब होत असे यासाठीच बारामती पोलिस विभागाला या फॉरेन्सिक व्हॅनची गरज होती, या व्हॅनमुळे दोषसिद्धीच्या प्रमाणात नक्कीच वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

ग्रामीण भागात विविध गुन्ह्यांचे प्रमाण मोठे आहे. ग्रामीण भागात चोरी, जबरी चोरी, दरोडा, खून आणि आत्याचार आशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कमीत कमी वेळेत आणि अचूक पुरावे मिळवणे शक्य होणार आहे. या व्हॅनमध्ये रासायनिक विश्लेषण करणारी उपकरणे, डीएनए नमुने तपासण्याची साधने आणि डिजिटल पुरावे जमा करण्याची सोय आहे. परिणामी पोलिस प्रशासनाला गुन्ह्यांचा जलद आणि प्रभावी तपास होण्यास मदत होणार आहे. फॉरेन्सिक व्हॅन गुन्हेगारी न्यायप्रणालीचा एक महत्त्वाचा भाग असून जी वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून न्यायदानाला मदत करते,अशी माहिती बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली आहे.

यावेळी बारामती पोलिस विभागातील प्रभारी अधिकारी यामध्ये सूर्यकांत कोकणे,पोलीस निरीक्षक,इंदापूर पोलीस ठाणे,सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटिल, वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे,विनोद मांगडे सहायक पोलीस निरीक्षक भिगवण पोलीस ठाणे,सचिन लोखंडे सहायक पोलीस निरीक्षक माळेगाव पोलीस ठाणे,राजकुमार डुणगे सहायक पोलीस निरीक्षक वालचंदनगर पोलीस ठाणे,मनोज नवसरे सहायक पोलीस निरीक्षक सुपा पोलीस ठाणे,वैशाली पाटील पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस ठाणे,गजानन चेके पोलीस निरीक्षक डीवायएसपी ऑफिस बारामती हे उपस्थित होते.

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे गुन्हा घटनेतील कार्य
पुरावे तपासणे – गुन्ह्याच्या घटनास्थळावरून मिळवलेले भौतिक पुरावे, यामध्ये केस, धागे, रक्त, स्फोटकांचे अवशेष, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदिचे विश्लेषण करणे
विश्लेषण करणे – उपलब्ध असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डीएनए प्रोफाइलिंग, फिंगरप्रिंट्स, विषशास्त्र आणि रासायनिक यांच्या वैज्ञानिक चाचण्या करणे.
निष्कर्ष काढणे – वैज्ञानिक चाचण्या नंतर विश्लेषण करून गुन्हेगारी घटनेबद्दलचा निष्कर्ष काढणे, यामध्ये गुन्हेगार कोण? कसा? घटनाक्रम कसा असेल किंवा गुन्हा कशा प्रकारे घडला.
निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून देणे – कायदेशीर प्रक्रियेत न्यायालयात पुरावे सादर करणे, जेणेकरून दोषींना शिक्षा देणे किंवा निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून देणे. अशा सर्व गोष्टींमध्ये पोलीसांना कमित कमी वेळेत सहाय्य होणार आहे.
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये उपलब्ध तंत्रज्ञान
• डीएनए विश्लेषक
• उच्च-क्षमतेचे सूक्ष्मदर्शक
• गॅस क्रोमॅटोग्राफ
• डिजिटल फॉरेन्सिक वर्कस्टेशन्स

‘मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन’ ही अद्वितीय आहे. ती वातानुकूलित आहे आणि गुन्ह्याच्या ठिकाणीच प्रयोगशाळेच्या वातावरणात स्पॉट टेस्ट करण्यासाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. फॉरेन्सिक व्हॅन गुन्हेगारी न्यायप्रणालीचा एक महत्त्वाचा भाग असून दोषसिद्धीसाठी वरदान ठरत आहे.
डॉ. सुदर्शन राठोड,उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती विभाग.
“गुन्ह्याच्या शास्त्रशुद्ध तपासासाठी फॉरेन्सिक व्हॅन देण्यात आली आहे. सदर व्हॅनमुळे दोषसिद्धीचे प्रमाणात वाढ होणार आहे.”
गणेश बिरादार, अपर पोलिस अधीक्षक, बारामती विभाग.






