अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीत दादांचा ‘मास्टरस्ट्रोक’! संभाजी होळकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड; ४ तालुक्यांची महत्त्वाची जबाबदारी

0
6
9
2
8
6
बारामती : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत आपले अत्यंत विश्वासू आणि अनुभवी सहकारी संभाजी होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पुणे जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण) नियुक्ती केली आहे. इंदापूर नगर परिषदेच्या तिकीट वाटपावरून निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने रिक्त झालेल्या या जागेवर आता होळकर यांची वर्णी लागली आहे.
संभाजी होळकर म्हणजे दादांचा ‘हुकमी एक्का’ असे समजले जाते,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती असलेल्या संभाजी होळकर यांच्याकडे संघटनेचा दांडगा अनुभव आहे. राष्ट्रवादीमध्ये पक्षफुटीच्या काळातही त्यांनी ठामपणे अजित पवार यांची साथ दिली होती. सलग १३ वर्षे बारामती तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहताना त्यांनी पक्षसंघटना तळागाळापर्यंत पोहोचवली. लोकसभा निवडणुकीत काही काळ त्यांच्याकडून जबाबदारी काढली गेली असली, तरी आता त्यांच्या निष्ठा आणि संयमाचे फळ त्यांना मिळाले आहे.

इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत तिकीट वाटपावरून तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि पक्षश्रेष्ठींमध्ये मतभेद झाले होते. पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर नाराज होऊन गारटकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत भाजपचा रस्ता धरला. यामुळे पुणे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ही पोकळी भरून काढण्यासाठी अजितदादांनी होळकर यांच्यावर विश्वास टाकला आहे.
होळकर यांच्या निवडीमागे अजित पवारांचे मोठे राजकीय गणित असल्याचे बोलले जात आहे. होळकर यांच्या खांद्यावर केवळ जिल्हाध्यक्षपदच नाही, तर बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर या राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा चार तालुक्यांची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये पक्षाची ताकद वाढवणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवून देणे, हे होळकर यांच्यासमोरचे प्रमुख आव्हान असेल.

नुकतीच संभाजी होळकर यांच्या संघटना कौशल्याची झलक बारामतीकरांना पाहायला मिळाली. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून त्यांनी बारामतीतील सर्व विविध संघटनांच्या पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा ऐतिहासिक प्रयत्न केला. त्यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमाचे आणि त्यांच्या सूक्ष्म नियोजनाचे सर्वत्र कौतुक झाले. त्यांच्या या ‘नेटवर्किंग’ आणि ‘जनसंपर्का’चा फायदा पक्षाला नक्कीच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संभाजी होळकर यांच्या निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील, विशेषतः बारामती आणि इंदापूर पट्ट्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. “संघटनेचा माणूस” नेतृत्वासाठी मिळाल्याने आगामी काळात पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक आक्रमकपणे काम करेल, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.





