Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कसा सुरक्षित राहील, ही जबाबदारी माझी आहे, हा विश्वास मी तुम्हाला देते.” विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, दादांच्या विकासकार्याला साथ द्या – सुनेत्रा पवार यांचे वडगाव निंबाळकर येथे आवाहन

0 9 4 5 5 3

वडगाव निंबाळकर: “बारामती तालुक्यात आज जो हिरवागार निसर्ग आणि सुजलाम-सुफलाम स्थिती दिसत आहे, ती केवळ आणि केवळ अजितदादांच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नांची देण आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधक दादांचेच नाव आणि रंग वापरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र, सभासदांनी या भूलथापांना बळी न पडता ‘कपबशी’ या चिन्हावर शिक्का मारून ‘श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’च्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे,” असे दमदार आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनी केले.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या (२०२६-३१) प्रचारार्थ मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’च्या वतीने संवाद बैठकांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. मुरूम, वाणेवाडी, कोऱ्हाळे खुर्द आणि कोऱ्हाळे बुद्रुक या गावांनंतर या दौऱ्याची सांगता वडगाव माळकर (निं.) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर एका जंगी सभेने झाली. यावेळी उपस्थित शेतकरी, कामगार आणि ग्रामस्थांच्या प्रचंड जनसमुदायाला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

आपल्या भाषणात सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वर कारखान्याच्या यशाचा आलेख मांडला. त्या म्हणाल्या, “यावर्षी सोमेश्वर कारखान्याने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात उसाला उच्चांकी भाव दिला आहे, ज्यामुळे सर्व शेतकरी सुखावले आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. मी नुकतीच मराठवाड्यातून आले आहे, तिथली अवस्था अत्यंत वाईट आहे. मात्र, बारामती तालुक्यात प्रत्येक रस्त्याने जाताना हिरवेगार शिवार, खळखळणारे पाणी आणि भरलेले तलाव दिसतात. हे चित्र केवळ दादांच्या अथक परिश्रमामुळेच शक्य झाले आहे. आज उभे असलेले उसाचे पीक ही दादांचीच देण आहे.”

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी तब्बल ३५० अर्ज आले होते. मात्र ज्यांनी मोठ्या मनाने आपले अर्ज मागे घेऊन पॅनेलला पाठिंबा दिला, त्यांचे सुनेत्रावहिनींनी मनःपूर्वक आभार मानले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “सध्या सोशल मीडिया आणि एआय (AI) च्या जमान्यात खरे काय आणि खोटे काय, हे ओळखणे कठीण झाले आहे. समोरच्या पॅनेलने मतदारांना संभ्रमात पाडण्यासाठी जाणीवपूर्वक दादांचेच नाव आणि दादांचाच रंग वापरण्याचा खेळ चालवला आहे. परंतु, सभासदांनी अशा कोणत्याही खेळाला बळी पडू नये. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कसा सुरक्षित राहील, ही जबाबदारी माझी आहे, हा विश्वास मी तुम्हाला देते.”

शेवटी मतदारांना भावनिक साद घालत सुनेत्रा पवार यांनी रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी ‘कपबशी’लाच मतदान करण्याचे आवाहन केले.

“आपल्या पॅनेलचे चिन्ह ‘कपबशी’ आहे. ‘कप’ म्हणजे जिव्हाळा आणि ‘बशी’ म्हणजे आपलेपणा! हाच जिव्हाळा आणि आपलेपणा दादांनी आपल्याला शिकवला आहे. त्यामुळे तुमचं एकही मत वाया न घालवता, ‘कपबशी’वर शिक्का मारून पॅनेल-टू-पॅनेल मतदान करा आणि दादांच्या नेतृत्वाला खरी ताकद द्या. तुमचा प्रत्येक शिक्का सोमेश्वर कारखान्याचे भविष्य निश्चित करणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वडगाव येथील या सभेला परिसरातील मान्यवर, संचालक मंडळाचे उमेदवार, ग्रामस्थ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणामुळे सोमेश्वरच्या निवडणूक आखाड्यात रंगत आणखी वाढली असून, ‘कपबशी’च्या बाजूने मोठे जनमत तयार झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे