Breaking
अभिव्यक्तीमहाराष्ट्रसामाजिक

पारंपरिक रूढींना फाटा देत मदने कुटुंबाचा पर्यावरणपूरक वारसा; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतली सांत्वनपर भेट

0 5 9 3 3 9

बारामती : बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब महादेव मदने यांचे सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मदने कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सगोबावाडी येथील निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. दरम्यान, मदने कुटुंबाने वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ अस्थींचे नदीत विसर्जन न करता वृक्षारोपण करून समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून सांत्वन

कुरणेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मदने यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तातडीने मदने परिवाराची भेट घेतली. यावेळी लक्ष्मण हाके यांनी मदने कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि बाळासाहेब मदने यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. नानासाहेब मदने यांचे ते वडील होते.

अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपणाचा संकल्प

पूर्वजांनी घालून दिलेल्या रूढी-परंपरांचा आदर राखतानाच, काळानुरूप त्यात बदल करणे आवश्यक असल्याचे मत नानासाहेब मदने यांनी व्यक्त केले. याच विचारातून मदने कुटुंबाने एक क्रांतीकारक निर्णय घेतला. बाळासाहेब मदने यांच्या सावडण्याचा कार्यक्रम सगोबावाडी येथे पार पडल्यानंतर, त्यांच्या अस्थींचे नदीत विसर्जन करून जलप्रदूषण करण्याऐवजी त्या पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सावित्रीबन परिसरात ‘वड’वृक्षाची लागवड

पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या हेतूने पणदरे विकास मंचाच्या सावित्रीबन परिसरात एक वडाचे झाड लावण्यात आले. या झाडाच्या बुंध्यातच वडिलांच्या अस्थी आणि राख विसर्जित करण्यात आली. वडिलांच्या आठवणी या वृक्षाच्या रूपाने सदैव जिवंत राहाव्यात आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे, या भावनेतून मदने कुटुंबाने हे पाऊल उचलले आहे.

 “आपल्या परंपरांचा सन्मान करताना निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. वडिलांच्या स्मृती या झाडाच्या रूपाने वाढत राहतील, हाच आमचा संकल्प आहे.”

नानासाहेब मदने (पुणे जिल्हा अध्यक्ष, जय मल्हार क्रांती संघटना)

मदने कुटुंबाच्या या उपक्रमाचे बारामती परिसरात कौतुक होत असून, केवळ श्रद्धेपुरते मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाचा हा संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे