गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! आमिष दाखवून पळवून नेलेली मुर्टी (ता. बारामती) येथील दोन अल्पवयीन मुले भीमाशंकरमधून सुखरूप ताब्यात

0
6
2
9
0
8
वडगाव निंबाळकर: अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेलेल्या बारामती तालुक्यातील मुर्टी येथील दोन अल्पवयीन मुलांना शोधण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे या दोन्ही मुलांना खेड तालुक्यातील भीमाशंकर येथून सुखरूप ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले आहे. मुलांच्या भेटीने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले असून त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुर्टी (ता. बारामती) येथील शुभम गणेश जाधव (वय १६ वर्षे) आणि पियुष विलास मोहिते (वय १५ वर्षे) ही दोन मुले अचानक बेपत्ता झाली होती. या मुलांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून आणि फुस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २७४/२०२५ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन शाळकरी मुले एकाच वेळी गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे यांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवली. गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली, तसेच गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले.
या दरम्यान पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली की, सदर बेपत्ता मुले ही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमाशंकर परिसरात आहेत. माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिसांचे एक पथक तातडीने भीमाशंकरकडे रवाना झाले. त्या ठिकाणी शोधमोहीम राबवून पोलिसांनी शुभम आणि पियुष या दोघांनाही सुखरूप ताब्यात घेतले.

मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र येथे आणण्यात आले. पोलिसांनी मुलांचे पालक श्री. गणेश दामू जाधव व श्री. विलास कुंडलिक मोहिते यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. आपली मुले सुखरूप असल्याचे पाहून पालकांचा जीव भांड्यात पडला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी पालकांनी वडगाव निंबाळकर पोलिसांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे कौतुक करत त्यांचे मनापासून आभार मानले.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी (बारामती उपविभाग) श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, तपासी अधिकारी तथा ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस हवालदार रमेश नागटिळक आणि पोलीस हवालदार अमोल भोसले यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.






