Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत पार्किंगच्या वादातून सिनेस्टाईल ‘राडा’; हॉटेलबाहेर तरुणावर जीवघेणा हल्ला, एकास अटक

0 6 0 2 7 5

बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गुंडागर्दी करणाऱ्यांना पोलीस निरीक्षकांचा सज्जड दम

बारामती:शहरातील भिगवण रोडवरील वृंदावन हॉटेलसमोर गाडी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टोळक्याने लोखंडी गज, काठ्या आणि दगडांनी केलेल्या या हल्ल्यात फिर्यादी तरुणाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत बारामती तालुका पोलिसांनी तत्काळ हालचाली करत एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ नोव्हेंबर रोजी घडली. फिर्यादी मानस पाटील (रा. तानाई नगर, बारामती) हे त्यांचे मित्र उदय, कुश, साहिल, मनीष, चैतन्य, ओंकार आणि स्वयम यांच्यासह भिगवण रोडवरील वृंदावन हॉटेल येथे जेवणासाठी गेले होते. हॉटेलबाहेर गाडी पार्किंग करत असताना तिथे उपस्थित काही अनोळखी तरुणांशी त्यांचा वाद झाला.

हा वाद तिथेच थांबला नाही. संशयित आरोपी देखील हॉटेलमध्ये जेवणासाठी बसले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी फोन करून आपल्या ८ ते १० साथीदारांना हॉटेलबाहेर बोलावून घेतले. फिर्यादी पाटील आणि त्यांचे मित्र जेवण आटोपून बाहेर येताच, दबा धरून बसलेल्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

काठ्या, लोखंडी गज आणि दगडांचा वापर

हल्लेखोरांनी पाटील आणि त्यांच्या मित्रांवर काठ्या, लोखंडी गज आणि दगडांनी बेसावध असताना जोरदार हल्ला केला. यात फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड आणि गजाने प्रहार करण्यात आले. तसेच, दगडफेक करून फिर्यादीच्या गाडीच्या काचा फोडून मोठे नुकसान करण्यात आले. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांची तत्परता आणि सीसीटीव्ही फुटेज

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हॉटेल आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, त्या आधारे आरोपींची ओळख पटवणे शक्य झाले.

यातील मुख्य आरोपी राम अनिल लोखंडे (वय २४, रा. खंडोबा नगर, बारामती) याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

पोलिस पथकाची कामगिरी

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, दिपाली गायकवाड तसेच पोलीस जवान जितेंद्र शिंदे आणि राजू बन्ने यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील करत आहेत.

“गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही”

बारामती एमआयडीसी (MIDC) परिसरात किंवा शहरात कोणीही दहशत निर्माण करण्याचा किंवा दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. हॉटेल चालक, व्यावसायिक आणि नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही दादागिरीची किंवा संशयास्पद हालचालींची माहिती न घाबरता तत्काळ पोलिसांना द्यावी.

श्री.चंद्रशेखर यादव (पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे