गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत गुंडांचा धुमाकूळ! हप्ता देण्यास नकार दिल्याने हॉटेल चालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; सराईत गुन्हेगारांचा समावेश

0
6
2
6
9
2
बारामती: शहरातील प्रगतीनगर परिसरात हप्ता (खंडणी/ प्रोटेक्शन मनी) देण्यास नकार दिल्याच्या रागातून हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गुंडांनी हॉटेलमधील रोख रक्कम लुटून पोबारा केला. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात सहा जणांसह दोन अनोळखी इसमांवर दरोडा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खुनाच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींचा समावेश असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक आकाश सिद्धनाथ काळे (वय २९, रा. देसाई इस्टेट, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश काळे यांचे प्रगतीनगरमधील चिंचकर चौकात ‘आपले चायनीज’ नावाचे हॉटेल आहे. १५ दिवसांपूर्वी आरोपींनी काळे यांच्याकडे हॉटेल चालू ठेवण्यासाठी हप्त्याची मागणी केली होती, मात्र काळे यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला होता. याचाच राग मनात धरून गुरुवारी (दि. २६) रात्री सव्वा आठच्या सुमारास आरोपींनी संगनमताने हॉटेलवर हल्ला चढवला.
आरोपींनी काळे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हॉटेलमध्ये दहशत निर्माण करत गल्ल्यातील ५०० रुपयांच्या १६ नोटा आणि १०० रुपयांच्या ३ नोटा अशी एकूण ८,३०० रुपयांची रोकड बळजबरीने लुटून नेली. जखमी आकाश काळे यांनी उपचार घेतल्यानंतर शनिवारी (दि. २७) पोलिसांत तक्रार दाखल केली.
गुन्ह्यात सराईत गुन्हेगारांचा सहभाग
या हल्ल्यात बारामतीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश आहे. पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे:
१. विनायक मारक (मांबरी) (सन २०१८ मधील खुनाच्या गुन्ह्यात आरोपी)
२. राहुल चव्हाण (सन २०१८ मधील खुनाच्या गुन्ह्यात आरोपी)
३. राज गावडे
४. आदित्य बगाडे
५. निहाल जाधव (अपघाताचा गुन्हा दाखल)
६. विवेक (पूर्ण नाव माहित नाही)
(सर्व रा. शेळकेवस्ती, दादा पाटीलनगर, तांदुळवाडी, बारामती) व इतर दोन अनोळखी मुले.
याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३११, ३०८, ३१०, १०९, ११५(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास मोरे करत आहेत.
सराईत गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याने बारामतीतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी अशा गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






