अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
कांबळेश्वरमध्ये ‘जादूगार शिवम’ यांच्या जादुई दुनियेत रमले आबालवृद्ध! मनोरंजनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर, कडाक्याच्या थंडीतही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शिवा काका कारंडे फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम.

0
6
0
2
7
1
कांबळेश्वर: तब्बल १७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कांबळेश्वर आणि परिसरातील ग्रामस्थांना जादुई दुनियेची सफर घडली. शिवा काका कारंडे फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. रेणुका स्वप्निल कारंडे यांच्या पुढाकाराने आयोजित ‘सुप्रसिद्ध जादूगार शिवम’ यांच्या जादूच्या प्रयोगाला कडाक्याच्या थंडीतही रसिक प्रेक्षकांनी, विशेषतः बालचमू आणि महिला वर्गाने प्रचंड गर्दी केली होती.

दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी कांबळेश्वर येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हा रंगतदार सोहळा पार पडला.
बच्चे कंपनीसाठी ठरली अविस्मरणीय पर्वणी
लहान मुलांच्या कोवळ्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवणारा हा कार्यक्रम ठरला. वडगाव निंबाळकर गावचे सुपुत्र आणि ‘बालगंधर्व’ तसेच ‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेते जादूगार शिवम यांनी आपल्या हातचलाकीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘झी टीव्ही’वरील गाजलेला शो ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये चमकलेले पहिले जादूगार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या जादूसोबतच ‘फुल टू कॉमेडी’ सादरीकरणाने कडाक्याच्या थंडीतही उपस्थितांना ऊर्जेने भरून टाकले. प्रत्येक बालमित्र आपण कधी स्टेजवर जातो आणि शाळेत जाऊन मित्रांना कधी किस्से सांगतो, या उत्सुकतेत दिसत होता.
मनोरंजनातून सामाजप्रबोधन आणि महिला जागृती
केवळ मनोरंजन न करता जादूगार शिवम यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला. भोंदू बाबा देवाच्या नावाखाली महिलांची फसवणूक कशी करतात, हे त्यांनी स्वतःच्या हातातील नोटा काढून दाखवत हातचलाकीचे प्रयोग सादर करून स्पष्ट केले. या माध्यमातून त्यांनी महिला वर्गाला अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
मान्यवरांची मांदियाळी आणि चिमुकल्या कर्मवीरची ‘डील’
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सभापती श्री. करण खलाटे यांनी आपल्या चिमुकल्यांसह हजेरी लावली. विशेष म्हणजे, त्यांचे सुपुत्र ‘कर्मवीर’ यांनी आदल्या दिवशीच जादूगार साहेबांशी ‘स्टेजवर बोलावण्याची डील’ पक्की केली होती, जी पूर्ण होताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी विराज खलाटे, सौरभ खलाटे, नाना मदने, गावचे पोलीस पाटील, अक्षय तांबे, महेंद्र भंडलकर यांच्यासह शिरसने, सांगवी, लाटे, माळवाडी आणि भिकोबानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवा काका कारंडे फाऊंडेशनच्या या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल श्री अमर शिवाजी तरुण मंडळ, कांबळेश्वर यांच्या वतीने आयोजकांना रु. १०,०००/- रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनचे हे उपक्रम तालुक्यात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहेत.







