Breaking
अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

तडीपार गुन्हेगार, इन्स्टाग्रामवर फॉर्च्युनरवरून दहशत व्हिडिओची दखल घेत बारामती पोलिसांचा दणका.

0 8 8 5 2 7

बारामती,दि. ०८ सप्टेंबर २०२६ : तडीपार असतानाही बारामती शहरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून फॉर्च्युनर गाडीवरून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर बारामती शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओची स्वतःहून दखल घेत पोलिसांनी अक्षय ऊर्फ सोन्या भिमराव कांबळे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सामान्य नागरिकांनी गुन्हेगारांना न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास इन्स्टाग्रामवरील एका अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. या व्हिडिओमध्ये एमएच-४२-बीएन-९७८६ या क्रमांकाच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीच्या टपावर आणि बाहेरील भागावर बसून काही तरुण नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचे उघडकीस आले. एक तरुण गाडीच्या खिडकीबाहेर लटकून हातवारे करत होता. या टोळक्याच्या कृत्यामुळे रस्त्यावरील नागरिक आणि वाहनचालक घाबरून बाजूला होत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत होते.

प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी या व्हिडिओची तात्काळ दखल घेत पडताळणीचे आदेश दिले. तपासात व्हिडिओमधील तरुण सराईत गुन्हेगार अक्षय ऊर्फ सोन्या भिमराव कांबळे असल्याचे निष्पन्न झाले. सोन्या कांबळे याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि पोलिसांवर हल्ला करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून १८ जानेवारी २०२५ ते १७ जानेवारी २०२७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. तरीही तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो बारामतीत आल्याचे उघड झाले.

नागरिकांच्या तक्रारीची वाट न पाहता पोलीस शिपाई गिरीश नेवसे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले करत आहेत.

तडीपार आरोपींची यादी :

बारामती शहर पोलिसांच्या अभिलेखानुसार
सोन्या कांबळेसह
धीरज पडकर,
अमोल कांबळे,
तुषार ऊर्फ चिंट्या सोनवणे,
वैभव बगाडे,
अक्षय सोनवणे आणि
निलेश उमरदंड
हे तडीपार आरोपी सध्या पोलिसांच्या विशेष निगराणीखाली आहेत.
या सर्व आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तपास पथकांना आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांचे आवाहन
हे गुन्हेगार शहरात दिसल्यास नागरिकांनी स्वतः त्यांच्याशी वाद न घालता किंवा त्यांचा पाठलाग न करता तात्काळ ११२ या क्रमांकावर किंवा थेट प्रभारी पोलीस निरीक्षकांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
बारामतीच्या सामान्य नागरिकाला गुन्हेगाराच्या भीतीने रस्ता बदलावा लागू नये, ही आमची स्पष्ट भूमिका असून तडीपार गुन्हेगारांनी शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असा सज्जड दम पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी यांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी आणि त्यांच्या तपास पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे